Sunday, September 13, 2020

व्यवसायासाठी भांडवल - 2

आपण आता आपला व्यवसाय सुरु करण्यास सज्ज झालो आहोत आणि त्यासाठी भांडवल कोठून मिळेल याचा मागोवा घेत आहोत. आपली भांडवलाची गरज व्यवसायाच्या सुरुवातीला तरी कमीत कमी असावी यासाठी आपण व्यवसायाच्या गरजांचा विचार करून ठेवलेला आहे. जागा, यंत्रे इत्यादी गोष्टी भाड्याने मिळू शकतील का ? उधारीवर व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी मिळू शकतील का ? लागणारे मनुष्यबळ फक्त कामाच्या वेळेसाठी यायला तयार आहे का ? इत्यादी गोष्टींवर आपण माहिती घेऊन सुरुवातीला कमीत कमी किती भांडवल लागेल हे निश्चित केले आहे.


आता आपल्याला आपले स्वतःचे किती पैसे उपलब्ध होऊ शकतील याचा विचार करायचा आहे. स्वतःकडील, नातेवाईक / मित्र यांची मदत या सर्वांमधून आपण किती गुंतवणूक करू शकतो हे माहीत असणे आवश्यक आहे. कर्जाच्या बाबतीत विचार करताना एकूण भांडवलाच्या गरजेच्या 25% रक्कम स्वतः उभी करणे आवश्यक असते. मोठ्या गुंतवणुकीसाठी ही 15% पर्यंत कमी चालू शकते. ही रक्कम वेगवेगळ्या परिस्थितीत वेगळी असू शकते आणि ती 0% ते 25% अशी आढळते. काही विशिष्ट व्यवसायांसाठी सरकारी मदत मिळू शकते, त्यासाठी आपण जो व्यवसाय करणार आहोत त्या संबंधातील सरकारी खात्याकडे जाऊन विचारणा करता येईल.

छोट्या व्यवसायासाठी Crowd Funding ह्या पद्धतीने कर्ज देणाऱ्या संस्थांचा विचार करण्यास हरकत नाही. कर्ज देण्याचे काम या संस्था सामाजिक कार्य या भावनेने करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या व्याजाचा दर कमी असतो. वेगवेगळ्या पतपेढ्या कर्ज देऊ शकतात आणि त्यासाठी आपल्या भागातील पतपेढयांचा विचार करणे आवश्यक. सहकारी बँकाकडे विनंती अर्ज करणे हे बऱ्याचदा उपयोगी होते. कारण, तेथे निर्णय प्रक्रिया तुलनेने सोपी असते. मात्र व्याजाचा दर थोडा जास्त असू शकतो. भांडवलाची गरज जास्त असल्यास राष्ट्रीयीकृत बँकांकडे जायला हरकत नाही.

आपण नेमके कोणाकडे जावे हे अनेक गोष्टींवर ठरते. व्यवसायाचे स्वरूप ( भाजी / फळे विक्री / केशकर्तनालय /  चार चाकी दुरुस्तीचे गॅरेज / छोटा कारखाना ), व्यवसायाचे ठिकाण, भांडवलाची गरज - 50,000 / 2,00,000 / 10,00,000 / त्यापेक्षाही जास्त. एकूण भांडवलातील खेळते भांडवल किती आणि घर / जागा / यंत्रे यातील गुंतवणूक किती. कर्जासाठी तारण देता येईल का ? ते  कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे आहे का ? कर्जाच्या परतफेडीची हमी द्यायला कोण तयार आहे ?त्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे का ? अशा अनेक गोष्टी यात येतात. ही यादी मोठी वाटली तरी ती आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये बरीचशी तयार केलेली असते. 

एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणीही व्यक्ती अथवा संस्था अथवा बँका पैसे केव्हा देतील ? जेव्हा त्यांना कर्जाच्या परतफेडी विषयी शंका असणार नाही. व्यवसाय करणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचे व्यवसायाबद्दलचे ज्ञान, अनुभव, व्यवसायाबाबतची आवड, व्यवसाय बाजारपेठेत चांगला चालण्याची शक्यता, व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी लागणारा खर्च भागवल्यावर उरणाऱ्या रकमेतून कर्जाच्या परतफेडीचा हप्ता भागू शकेल का ?व्यवसायात  वर्षभर नफा मिळू शकेल का ? तो  काही महिन्यात चांगला व इतर काळात मंदीत असेल का ? अशा व्यवसायात चांगल्या चालणाऱ्या काळात वर्षभराच्या गरजेच्या एवढा नफा मिळेल का अशा सार्‍या गोष्टींचा विचार कर्ज मंजूर करताना केला जातो. व्यक्तीचा CIBIL Score सुद्धा फार महत्त्वाचा असतो.  त्याने या पूर्वी घेतलेली कर्जे वेळेवर फेडली आहेत का, हे त्यावरून लक्षात येते.  

कर्जाच्या मंजुरीसाठीची कागदपत्रे, त्यासाठीची तयारी, व्यवसायाची योजना इ. माहितीसाठी आपण www.deasra.in वेबसाईटवर जावे.  देआसरा फाउंडेशन यासाठी आपल्याला मदत करू शकेल.  

---- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. ©यशस्वी_उद्योजक