Tuesday, May 26, 2020

उद्योग संधी कशी हेरायची ?? ( भाग - 2 )

आपण समाजात वावरताना ज्या वस्तुंचे व्यवहार करत असतो, त्या व्यवहारांकडे बारकाईने बघण्याची सवय करुन घेणे गरजेचे आहे. ज्वारीच्या लाहीचे  १०० ग्रॅम चे पाकिट ३० रु. मिळते. हे पाहिल्यावर ह्या व्यवहारात लाही बनविणाऱ्या  व्यक्तीला काय फायदा मिळत असेल, त्याचा हिशोब मनात यायला पाहिजे. ऑटोरिक्शा मधे बसल्यावर मीटरवर येणारे आकड़े - उदा. किती अंतर, किती पैसे, किती वेटींग टाइम - सिग्नल वगैरे ला थांबल्यावर - ट्रैफिक जाम असल्याने इ. ते नीट पाहिल्यावर समजते की रिक्शाचे भाड़े अंदाजे १२ रु. दर कि.मी. दराने द्यावे लागत आहे. हे तर साध्या चार चाकीच्या भाड्यासारखे आहे. फरक इतकाच महत्वाचा की चार चाकी गाड़ी अशी ३-४ कि.मी. साठी उपलब्ध नाहीये. 

देआसराच्या वेबसाइट www.deasra.in वरती आपणा सर्वाना वेगवेगळ्या आणि अत्यंत नेहमीच्या असणाऱ्या ७० उद्योगांची मार्गदर्शकपर माहिती उपलब्ध आहे. हे उद्योग आपणाला सर्वच ठिकाणी दिसतात आणि चांगले चालतात.  त्यापैकी काही उद्योग आपणांस उपयोगी ठरायची शक्यता आहे. 


उद्योग कोणता करायचा हे ठरवताना स्वतःच्या मनातल्या विचारांना, स्वतःच्या आवडीला, स्वत:च्या स्वप्नांना जरूर महत्व दया. त्याचबरोबर काही गोष्टींना बळी पडू नका. ह्याबद्दलची काही उदाहरणे देतो. 

एक युवक म्हशी पालनाचा उद्योग सुरु करायला आला. त्याच्या मामांचा गोठा भोर जवळच्या गावात होता आणि तो त्यानी लहानपणी पाहिलेला होता. त्याचे गाव सांगलीजवळ होते अन तेथे तो १० म्हशी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरु करणार होता. हा व्यवसाय नवीन माणसाने करण्यासारखा नाही.  तो पूर्णपणे समजून घेण्यासाठी मामांच्याकडे राहून सर्व गोष्टी शिकून घेण्याविषयी सुचवले. मामा अगदी जवळ असता तर त्याने मदत केली असती पण,   तो बराच लांब आहे त्यासाठी स्वतः सर्व गोष्टी - हा उद्योग, त्यातील खाचाखोचा, त्यातील पैश्याचे व्यवहार, त्यातील धोके, अडचणी व त्यावरील उपाय, ह्या सर्व गोष्टी बारकाईने शिकणे आणि आत्मसात करणे अत्यंत आवश्यक. सांगलीजवळ त्याला चांगला माहितगार माणूस मिळू शकला असता. परंतू, त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून रहावे लागले असते. शिवाय, उद्योगाचे संपूर्ण भवितव्य त्या व्यक्तीवर सोडवे लागले असते. त्या युवकाने मामाकडे एक वर्ष राहून त्यानंतर स्वतःचा उद्योग सुरु केला. 

एक पिता - पुत्र व्यवसाय मार्गदर्शनासाठी आले. मुलगा नुकताच इंजीनियर झाला होता आणि त्याचे   वडील ३७ वर्षे  एका मोठ्या कारखान्यात काम करुन निवृत्त झाले होते. त्यांच्या कारखान्यात ते स्टिल फॅब्रिकेशनच्या डिझाइनचे काम पाहात होते. त्यांना स्वतःला प्रत्यक्ष कामाचा अनुभव नव्हता आणि मुलाला  कुठलाच अनुभव नव्हता. त्यांना घरासाठी लागणारे ग्रील, सेफ्टी डोर, जीना अश्या प्रकारचे वेल्डिंग करुन वस्तू तयार करण्याचा उद्योग सुरु करायचा होता.  निवृत्तीनंतर मिळालेले पैसे त्यांच्याकडे होते आणि त्यामुळे त्यांना उद्योग सुरु करायला अडचण   वाटत नव्हती. त्या दोघांनाही ह्या उद्योगासाठी लागणारे भांडवल,  स्टील कोठून आणायचे, भाव काय, वस्तूची किंमत ( विकण्यासाठी ) कशी ठरवायची, पेंटिंग, पावडर कोटिंग, प्लेटिंगचे सध्याचे दर, एकंदरीत असलेला उद्योगासाठीचा स्कोप, अश्या गोष्टींचा त्यांनी विचार केलेला नव्हता. वडील जरी अनुभवी नसले तरी त्यांचा अनुभव हा मोठ्या कंपनीतला होता, ज्यामधे प्रत्येक कामासाठी वेगळा माणूस असतो आणि व्यावहारिक बाजूंची  ( किंमती / खर्च  / वेगवेगळे कर / करांचा परतावा ) फारच कमी लोकांना माहिती असते. हे सगळे मुद्दे समजावून सांगितल्यावर वडिलांनी मान्य केले की बरीच तयारी करणे आवश्यक आहे. मुलाने एका अशा  उद्योगात काम करुन अनुभव घ्यायचे ठरविले अन ते दोघे पुढील तयारीसाठी निघून गेले.   

पन्नाशीच्या एक महिला त्यांच्या मुलीसोबत मार्गदर्शनासाठी आल्या. त्यांना मसाल्याचा व्यवसाय करायचा होता. त्यांनी ज्यांना ज्यांना मसाला बनवून दिला त्या सर्वांना तो मसाला आवडला होता. म्हणून त्यांना त्या व्यवसायात शिरायचे होते. त्यांनी मसाला ज्यांना दिला होता ते सर्वजण त्यांच्या चांगल्या परिचयाचे होते. मी त्यांना पन्नास सैंपल्स बनवून अपरिचित अशा लोकांना पाठवायला सांगितले. ज्यांना आवडेल त्यांनी तसे कळविल्यास प्रत्येकाला २०० ग्रॅम मसाला मोफत पाठविला जाईल, असे त्या सैंपल वर लिहिले होते. पुढील एक महिन्यात कोणीही त्यांना सैंपल आवडल्याचे कळविले नव्हते. परिचयाच्या लोकांनी खरेखुरे मत दिले नसावे असे वाटले. त्यांनी हाच प्रयोग आणखी पन्नास लोकांवर करूनही कोणीही त्यांना संपर्क केला नाही. आपली वस्तू खरोखरच ग्राहकास चांगली वाटते आहे का ? हे नक्की झाल्याशिवाय त्यावर उद्योग सुरु करणे जोखमीचेच की !!
त्यांनी मसाल्याच्या व्यवसायाचा विचार सोडून दिला. 

वरिल उदाहरणे ही व्यवसाय किंवा उद्योग ठरविताना काय विचार करावा हे कळण्यासाठी दिली आहेत. काही गैरसमजूतीतून उद्योग सुरु करू नयेत ह्या साठी दिलेली आहेत.  


---- 


लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.


















Friday, May 15, 2020

उद्योग संधी कशी हेरायची ?? ( भाग - 1 )

उद्योग कोणता  करावा हा प्रश्न बहुतेकांना पडलेला असतो. दे आसराच्या कार्यालयात अनेक जण हा प्रश्न विचारण्यासाठी येत असत. मी  नेमका कोणता BUSINESS करू असे ते विचारत असत. कोणत्याही व्यक्तीविषयी फारशी माहिती नसताना अशा प्रकारचे उत्तर देणे अशक्य असते. कारण,
व्यक्ती, तिची शैक्षणिक पात्रता, कौटुंबिक परिस्थिती, व्यवसायाबद्दलची मानसिकता, कुटुंबाचा असणारा व्यवसायाबद्द्लचा दृष्टिकोन,व्यावहारिक जगाचा अनुभव, कौशल्य संपादन, राहण्याचे ठिकाण अशा अनेक गोष्टींवर व्यवसाय कोणता करावा ह्याबद्द्ल ठरवता येऊ शकते. अर्थात त्यातील काही गोष्टी अनुकूल नसताना सुद्धा व्यवसाय सुरु करुन यशस्वी झालेल्या व्यक्तींची उदाहरणे पहावयास मिळतात पण ती अपवादात्मक असतात. 



आपल्या गावात किंवा जवळच्या गावात, तालुक्याच्या गावात तसेच शहरात सुरु असलेले अनेक व्यवसाय आपण पाहतो. त्यातले काही व्यवसाय आपणही करू शकतो. मात्र त्या साठी तो व्यवसाय ज्या ठिकाणी सुरु करायचा त्या ठिकाणी त्या व्यवसायाच्या उत्पादनाला किंवा सेवेला मागणी असली पाहिजे.  एखाद्या छोट्या गावात एकाच व्यवसायाची अनेक दुकाने चालविण्याची शक्यता कमी असते. आपण जो व्यवसाय करू इच्छितो त्यासाठी किती मागणी आहे अन सध्या ती मागणी कोण पुरवत आहे, मागणी पुरविणाऱ्या बद्दल काय मत आहे, त्याची किंमत, दर्जा आणि सेवेवर त्याचे ग्राहक समाधानी आहेत का ? आपण व्यवसाय सुरु केल्यावर आणि चांगली सेवा दिल्यावर गिऱ्हाईक आपल्या कड़े येण्याची शक्यता आहे का ? हा विचार करणे आवश्यक आहे. तसेच आपण राहतो त्या ठिकाणी अथवा आपण ज्या भागात नेहमी जातो त्या ठिकाणी आपल्याला असे काही कळाले आहे का ? जे त्या भागातील लोकांना हवे आहे पण उपलब्ध नाही, हवे आहे पण महाग मिळत आहे, हवे आहे पण चांगल्या दर्जाचे मिळत नाही, अशा परिस्थितीतही लोकांची गरज पुरविण्याची संधी आपल्याला मिळू शकते. 

काही वेगळा विचार करुन ज्या गोष्टींची गरज सुप्त आहे ती ओळखून व्यवसाय सुरु करणे शक्य आहे. वेगवेगळ्या गृहनिर्माण संस्थेमधील ज्येष्ठ नागरीक, महिला व मुला / मुलींना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार बुद्धिबळ शिकवणे हा त्यातील एक. शाळांच्या सहलीची जबाबदारी घेऊन मुलांना सहलीला नेवून सुखरूप परत आणणे हा दूसरा. यामधे शैक्षणिक सहल, करमणूक सहल , सामाजिक सहल, धार्मिक सहल अशा अनेक सहलींचे आयोजन करता येते. शाळा, गृहनिर्माण संस्था, महिलांचे भिशी मंडळ, अशा अनेक समुहांसाठी  ह्या व्यवसायाला वाव आहे. वेगवेगळ्या घरगुती समारंभासाठी त्यांच्या आवडीचा केक बनवून तो त्यांच्या सोयीनुसार घरी पोहोचवणे ( रात्री ११:३० वाजता ) हा सुद्धा असाच एक ' हटके ' व्यवसाय.

ग्रामीण भागातील युवकांसाठी सुद्धा अनेक पर्याय आहेत. नजीकच्या शहरातील ग्राहकांना त्यांच्या गरजा पुरविण्यासाठी  पुढाकार घेऊन, त्यांना हवे ते, हवे तेव्हा अन हव्या त्या स्वरुपात पुरवणे. ह्या मधे उत्पादक शेतकरी ते ग्राहक असा संबंध असल्याने किंमत चांगली मिळते आणि अनेकांना काम मिळते. कचऱ्यातून खत, गाईच्या दुधापासून पंचगव्यापर्यंतची उत्पादने, पालापाचोळ्यापासून काही उत्पादने बनवणे शक्य आहे. सोललेला लसूण रोज निरनिराळ्या हॉटेल्स, केटरर्सना पुरविणे, पनीर बनवून रोज ठिकठिकाणी पुरविणे, सिताफळाचा ' गर ' काढून रबड़ी, आईस्क्रीम, मिल्कशेक उत्पादकांना पुरविणे, अशा प्रकारचा व्यवसाय ही असू शकतो. सेंद्रिय (Organic ) उत्पादने, त्यासाठी अनेक शेतकऱ्यांबरोबर समुहाने उत्पादन करणे व वितरित करणे, ( त्यात दूध व दुधापासूनचे पदार्थ ) ह्याला ही मोठा वाव आहे. 

यशस्वी उद्योजकच्या अंकातून अशा अनेक व्यवसायांविषयी माहिती असल्याने तो नियमित वाचल्यास त्यातून काही ' Business Ideas ' नक्की मिळतील. 

---- 


लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

Saturday, May 9, 2020

मी उद्योग व्यवसाय करू शकतो का ??

उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या मनात वरील प्रश्न डोकावत असतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल लागू शकते, शिवाय त्या व्यवसायाबद्दल अनुभव / माहिती असणे जरूरीचे असू शकते. व्यवसाय म्हणलं की यश मिळेल का ? याबाबत शंका / कुशंका येऊ शकतात. अपयश आल्यास आपले आप्तस्वकीय आपल्याला काय म्हणतील  त्याबद्दलही मनात विचार येऊ शकतात. ह्या सगळ्या मनातील विचारांचा परिणाम आपल्या पुढील कृतीवर होतोच.


खरं तर आपण आपल्या लहानपणापासून अनेक उद्योग खूप जवळून पाहात असतो. अनेक उद्योग हे कमी भांडवलात होऊ शकतात हेही समजलेले असते. भाजी /फळे, खाद्यपदार्थांची विक्री , स्टेशनरीचे दुकान, गोळ्या बिस्किटांचे दुकान, विद्युत उपकरणांची दुरुस्ती, फुलांची / हाराची विक्री, फुलगुच्छ बनवून विक्री, केशकर्तनालय, शिवणकाम, ऑटोरिक्षा / टॅक्सी चालवणे अशा उद्योगांपासून ते छोट्या स्वरुपाचा कारखाना उभा करण्यापर्यंत अनेक उद्योग आपण पाहिलेले असतात.  त्या उद्योजकांशी आपण बोलले देखील असतो. त्यातील काही चांगल्या माहितीचे झालेले असतात.

आपण विचार केला पाहिजे की त्यातील बहुतांशी जण आपल्या सारखेच असतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी / शिक्षण आपल्यासारखीच असते. म्हणजे ते जे काही करत आहेत, ते आपल्यालाही जमायला पाहिजे. त्यांना जे यश मिळाले आहे त्यांच्या व्यवसायात, तसे मलाही मिळायला हरकत नाहीये. त्यांच्या व्यवसायाच्या बळावर ते त्यांचे घर व्यवस्थित चालवत आहेत, तसे मलाही चालवता आले पाहिजे.   अर्थात यश मिळवण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे उमेदवारी / कष्ट केले, यशासाठी धडपड केली,कसोटीच्या काळात संयम बाळगला, त्याप्रमाणे मी सुद्धा ह्या सर्व गोष्टी केल्या  पाहिजेत अन त्यासाठी माझी तयारी आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मनाला आश्वस्त केल्यावर पुढील विचार करायला सुरुवात केली पाहिजे. कोणताही उद्योग करण्याचा विचार करताना प्रथम आपल्या ग्राहकाचा विचार महत्वाचा. आपण आपला हा उद्योग ज्या भागात करायचा त्या भागातील संभाव्य ग्राहकांची गरज काय आहे आणि आपण ती कशा प्रकारे भागवू शकतो ?

ग्राहक आपल्याकड़े येण्यासाठी आपण काय करू शकतो ? ग्राहकांची गरज आता कोण भागवत आहे आणि त्या मंडळींपेक्षा, दर्जा , किंमत, उपलब्धता ह्यापैकी कोणती गोष्ट मी ग्राहकाला जास्तीची देऊ शकतो ? चांगला दर्जा असला तर किंमत जास्त असूनही ग्राहक त्याला पसंती देऊ शकतो. व्यवसायाच्या जागेच्या अवती भवती आपले ग्राहक आहेत का ? ते संख्येने किती आहेत त्याचाही अंदाज महत्वाचा. बाजारपेठेतील जागा असल्यास गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल. त्या ठिकाणी गिऱ्हाईकांची संपूर्ण सोय ( त्वरित पुरवठा / विक्री करण्याची व्यवस्था आणि मालाची उपलब्धता ) हा महत्वाचा भाग असेल.

ग्रामीण भागातून शेतीमाल / फळे आणवून घेवून वेगवेगळ्या कंपन्यांच्या किंवा सहकारी गृहसंस्थेच्या आवारात विक्री करणे, शेतमालावर प्रक्रिया करुन ( निवडणे, स्वच्छता करणे, चिरणे, सोलणे अशा सारख्या प्रक्रिया ) आधी आर्डर घेऊन त्याप्रमाणे घरोघरी पुरवठा करणे, फणस, डाळिंब, पपई सारख्या फळांवर काम करून खाण्यास सुलभ करुन विकणे,  अश्यासारख्या व्यवसायाला बराच वाव आहे. ह्या गोष्टींचा जम बसवायला वेळ लागतो पण त्यानंतर पुढील प्रवास सुखकर होतो. शहराच्या उपनगरात अश्या प्रकारच्या  व्यवसायाला चांगलाच वाव आहे.

---- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.