Thursday, August 20, 2020

व्यवसायासाठी भांडवल -1

 बहुतांशी इच्छुक व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी काय लागते असे विचारले की त्याचे उत्तर असते भांडवल. अशा या बहुतांशी लोकांच्या मनातल्या विषयावर आज आपण विचार करणार आहोत.  आत्तापर्यंत या विषयाकडे येण्याआधी आपण व्यवसाय सुरु करण्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. व्यवसाय करणे ही मोठी जोखमीची बाब आहे, डेअरिंग - धाडस अशी समजूत अनेकांची असते. पूर्वतयारी न करता व्यवसाय सुरू करणे ही मोठी जोखीम असते हे मान्य.  मात्र, पूर्वतयारी उत्तम झाल्यास यश मिळण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढते हे नक्की. ज्याप्रमाणे परीक्षेतील यशासाठी उत्तम अभ्यास करावा लागतो, त्याप्रमाणे व्यवसायाचे ही आहे.  चांगल्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केल्यानंतरही नापास झाला असे उदाहरण माझ्या अनुभवात नाही. 

 
व्यवसायाची पूर्ण तयारी असल्यानंतर आपल्या मनातील व्यवसायाचे स्वरूप पक्के होते.  व्यवसाय कोणता, कुठे करावा व तो छोट्या का मोठ्या स्वरूपात करावा हे ठरते.  त्या व्यवसायातील बारीक सारीक बाबी, त्यातील आर्थिक बाबी, त्याच्या स्पर्धकांविषयीची माहिती आणि या सर्वांवर बेतलेले आपले अंदाज याबाबत आपली तयारी कागदावर आणि मनात पक्की होते. व्यवसायाच्या जागेच्या जवळच्या ग्राहकांना काय हवे आहे अन आत्ताच्या परिस्थितीत तो किती संतुष्ट आहे हेही आपल्याला माहीत आहे.  साहजिकच, या विषयावर आपण अत्यंत आत्मविश्वासाने बोलू शकतो. 

व्यवसायाची सुरुवात करताना कमीत कमी किती पैसे लागू शकतील ह्याचा विचार फार महत्त्वाचा.  कोणताही व्यवसाय सुरू केल्यावर त्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी वेळ लागतो. स्पर्धकांपेक्षा आपण खूप चांगले उत्पादन किंवा सेवा देत असू तर ग्राहक वर्ग लवकर आपल्याकडे येऊ लागतो.  तरीही, त्यासाठी काही महिने लागू शकतात. या काळात आपल्याला तोटा होऊ शकतो.  तो कमीत कमी होण्यासाठी व्यवसाय सुरू करताना भांडवल कमीत कमी लागण्याच्या दृष्टीने व्यवसायाची आखणी केली पाहिजे. 

भाजीचा व्यवसाय असेल तर सुरुवातीला जास्त काळ टिकणाऱ्या भाज्यांने  सुरुवात करता येईल.  भाड्याची जागा  असल्यास कमीत कमी जागा लागेल तेवढीच घ्यावी. पुढे  लागू शकेल म्हणून जास्त मोठी जागा घेतल्यास त्याचे भाडे जास्त पडेल आणि सुरुवातीच्या काळात आपला तोटाही वाढेल. जागेतील अंतर्गत सजावट न करता मालाची रचना व्यवस्थित करण्यासाठी लागेल तेवढीच व्यवस्था करणे आवश्यक. व्यवसायाच्या सुरुवातीला बाहेरची मदत किंवा नोकर नेमण्यापेक्षा घरातील कोणी किंवा मित्रांपैकी कोणी मदतीला असणे उत्तम. त्यामुळे सुरुवातीचा खर्च कमीत कमी होतो. व्यवसायानुरुप ह्याबाबतीत जेवढे शक्य आहे तेवढे खर्च कमी करणे आवश्यक.  सेवेची उपलब्धता मात्र पूर्णवेळ असणे महत्त्वाचे.  स्वतःकडे भांडवल उपलब्ध असल्यास थोडा जास्त खर्च करावयास हरकत नाही. मात्र कर्ज काढून सुरुवात करताना भांडवलाची गरज आणि खर्च कमीत कमी करणे आवश्यक आहे.

भांडवल आणि खर्चाविषयी आपला विचार पक्का झाला की आपल्याला भांडवल कोण पुरवेल याचा विचार करता येईल.  सर्वप्रथम आपल्याकडे किती पैसा उपलब्ध करता येईल याचा विचार करावा. बँकेतून कर्ज काढायचे ठरवले तरी एकूण गरजेच्या २५% प्रमाणात प्रथम आपण पैसे उभे करावे लागतात.  हे प्रमाण काही योजनांमध्ये कमी असू शकते.  आपल्याकडे तेवढे पैसे नसल्यास आपले आप्तस्वकीय, मित्रमंडळी यांच्यापैकी कोणी तात्पुरते का होईना पैसे द्यायला तयार होईल का याचा विचार करावा.  आत्तापर्यंतच्या जीवनात आपल्याला आजूबाजूच्या लोकांची - नातेवाईकांची - समाजातील काही ज्येष्ठ मंडळींची माहिती झालेली असते. त्यापैकी काही आपल्याबद्दल चांगले मत झालेले असू शकतात.  त्यांच्याकडून मदत होईल का याचा आढावा घ्यावा.  आपल्या व्यवसायाच्या बद्दल केलेली तयारी आणि त्यातून परतफेड करण्याची क्षमता याविषयीची माहिती त्यांना द्यावी.  लागणारे सर्व पैसे एकाच व्यक्तीकडून घ्यावे असे नाही, चार-पाच जण मिळून मदत करणार असतील तरी ती उपयुक्त आहे. मात्र,  त्यानंतर त्या सर्वांना आपल्या व्यवसायाविषयी, प्रगतीविषयी ठराविक काळाने माहिती देणे आवश्यक आहे. कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज घेण्यासाठी असलेल्या अनेक संस्था,  त्यातील फायदे-तोटे इत्यादींचा आपण पुढील भागात आढावा घेऊ.  

---- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.