Wednesday, April 15, 2020

मनातील उद्योगाविषयी पुढचे पाऊल ..!

               
 दे आसरा फाउंडेशन सुरु होऊन आतावर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. ह्या काळात अक्षरशः हजारों व्यक्तींची प्रत्यक्ष भेट झाली. अशा व्यक्ती की ज्यांना स्वतः व्यवसाय करण्याची ईच्छा होती अणि नेमके काय करावे हे नक्की करता येत नव्हते. मनात कोणता व्यवसाय करावा अन कोठे जागा निवडावी, ह्याबद्दल विचार केलेला असायचा पण मनात भीती असायची की सगळं आपल्याला जमेल ना ? समजा नाही जमले तर घरातले अन आजूबाजूचे आपल्याला काय म्हणतील ? घरातला महिलावर्ग आत्ताच आपल्याला विरोध करीत आहे. ह्या परिस्थितीतील व्यक्तींना मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते.
                    मार्गदर्शक असा की ज्याने ह्या इच्छुक उद्योजकाला समजून घेऊन त्याच्या विचारांना दिशा देण्याचे काम केले पाहिजे. विचारांमधील त्रुटी लक्षात घेऊन त्या दूर करण्याचे काम केले पाहिजे. उद्योगातील जोखिम लक्षात आणून देऊन ती कशी कमीतकमी होईल  यासाठीचे उपाय सुचविले पाहिजेत. त्याचबरोबर एखाद्या अव्यवहार्य ( NOT Feasible) विचारांची जाणीव करुन द्यायला पाहिजे.
                    असा मार्गदर्शक कोठे मिळेल ? असा मार्गदर्शक जे सांगेल ते योग्य असेल का ? त्याच्या भरवशावर आपण पुढील वाटचाल करावी का ? सर्वसाधारणपणे आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपण अशा काही व्यक्ती पहिलेल्या असतात की ज्या स्वतः चांगल्या माहितगार असतात, ज्यांना व्यावहारिक जगाचा भरपूर अनुभव असतो. आपल्याच शाळेतले / कॉलेजातील शिक्षक, नात्यातील काही व्यावसायिक  / उद्योजक , आपल्या गावातील काही यशस्वी व्यापारी / उद्योजक, आपल्या मित्रांच्या नात्यातील काही व्यक्ती यापैकी कोणीतरी आपल्या डोळ्यासमोर येतील.  त्यांच्याशी विविध प्रकारे संपर्क साधुन आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करू शकतो.
                            आपल्याला उद्योजकतेविषयी आणि आपल्या विचारातील उद्योगाविषयी संपूर्ण मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा न करता, त्याविषयी काही सुचना, वेगळा दृष्टिकोन मिळेल अशी अपेक्षा ठेवली पाहिजे.  त्याचा उपयोग आपल्याला काही प्रमाणात नक्की होईल. संपूर्ण मार्गदर्शनासाठी अर्थातच आपल्याला देआसरा फाउंडेशनला ( फोन नं - 8669985599 ) संपर्क करावा लागेल. त्यांचे काम ह्या संचारबंदीच्या काळातही सुरु आहे. सोम-शुक्र. सकाळी १० ते संध्याकाळी ६ ह्या वेळेत. ह्या संबंधातिल काही उदाहरणे आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील.

१.
         एका चष्म्याच्या उद्योजकाला आपले दुकान चालत नसल्याने दुसऱ्या परिसरात हलवावे लागले.  ते चालले नाही कारण त्या परिसरात चष्म्याची  अनेक दुकाने खुप आधीपासून सुरु होती अन परिसरातील रहिवाश्यांबरोबर  त्यांचे  चांगले संबंध जोडले गेलेले होते. उद्योजकाला ह्या व्यवसायाविषयीची बाजू आणि अनुभव असूनही  त्याला यश मिळाले नव्हते.

२.
        एका अल्पउत्पन्न रहिवाश्यांच्या परिसरात एकाने अत्यंत उच्च दर्जाच्या किराणामालाचे दुकान सुरु केले. त्या दुकानातील माल हा एका उत्कृष्ठ दर्जाच्या ब्रँडचा   होता आणि त्याच्या किमती खुप जास्त असत. साहजिकच त्या परिसरामध्ये ह्या दुकानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वर्षभरात ते दुकान बंद करावे लागले.

 ३.                      
       एका महिलेने तिच्या शिवणकामाच्या कौशल्यावर स्त्रियांचे कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यात तिला चांगले यश मिळाले. तिचे दुकान हमरस्त्यापासून आतल्या बाजूला होते. काही वर्षांनी तिच्या शेजारचे दुकान उपलब्ध होते आहे असे पाहून तिने तेथे तयार कपड्याचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी तिने बॅंकेकडून कर्ज घेऊन मालाचा पुरेसा साठा केला, दुकान हमरस्त्यापासून दूर असल्याने त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि ६ महिन्यात नवीन माल न आणल्याने माल खपेना. शेवटी सगळा साठा ठोक पद्धतीने ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना विकून उद्योगातुन बाहेर पडावे लागले.

वरील उदाहरणावरून लक्षात येईल की आपल्या उद्योजकीय प्रवासासाठी आपल्याला कशा पद्धतीने विचार करावा लागेल. उद्योगाच्या अनेक पैलूंचा विचार आपल्या योजनेमध्ये केला तर उद्योग यशस्वी होण्याची शक्यता जवळ जवळ  १००% होईल.    



---- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.




   

Tuesday, April 7, 2020

उद्योजक आणि आरोग्याचे महत्त्व !!

 नुकतेच CBSE चे ९वी चे पुस्तक वाचण्यात आले. त्यामधे दूसरा धड़ा आहे ' People As Resource ' या नावाचा.  त्यामध्ये त्यांनी मनुष्यबळाच्या उत्पादकतेविषयी भाष्य केलेले आहे. मनुष्य हा शिक्षित व कौशल्य प्रशिक्षित असल्यास तसेच आरोग्यपूर्ण असल्यास उत्पादन होऊ शकते. त्यामुळे मनुष्यबळ खुप जास्त असले तरी ते ' बोजा ' न बनता हुकमी पत्ता बनू शकते. पुढे त्या धड्यामधे सरकारने केलेल्या यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, कौशल्य शिक्षण, उद्योजकता व त्याविषयीच्या योजना यांच्याविषयी माहिती आहे. तसेच आरोग्यसेवा सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केले त्याविषयी माहिती आहे. 

खरे तर कोणत्याही गोष्टी करत असताना प्रत्येकाने आरोग्याकडे तेवढेच लक्ष देणे महत्वाचे आहे. विद्यार्थीदशेतही केवळ अभ्यास एके अभ्यास करुन चालत नाही. परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी तब्येत चांगली राखणे तितकेच महत्वाचे असते. कितीतरी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आजारपण येते अन  मग त्या अत्यंत महत्वाच्या काळात मनासारखा अभ्यास केला जात नाही. आरोग्याकडे चांगले लक्ष दिल्यास परीक्षा आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने दिली जाते अन उत्कृष्ठ यश मिळू शकते. 



उद्योजकाला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे अगदीच अत्यावश्यक !! 

त्याच्या उद्योगात / व्यवसायात त्याला पूर्णपणे लक्ष द्यावे लागते. शिवाय उद्योगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी धावपळ करावी लागते. उद्योग चालू असताना वेळोवेळी येणाऱ्या बदलांसाठी जागरूक राहून त्वरित निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक ताण तर नेहमीचीच गोष्ट, त्यासाठी मानसिक शांतता राखुन निर्णय घेणे, वेगवेगळ्या लोकांशी संवाद करणे गरजेचे.  त्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य राखणे अत्यावश्यक ठरते. उद्योजकाने त्याचे ज्ञान, अनुभव आणि आर्थिक बळ सर्वच गोष्टी त्याच्या उद्योगात / व्यवसायासाठी गुंतवलेल्या असतात. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना वेळ दिलेला नसतो. या सर्व गोष्टींची गुंतवणूक त्याने केलेली असते. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून तो ही गुंतवणूक फलदायी कशी करणार ? 

उद्योजकाचा बराचसा दिवस योजनाबद्ध नसतो. घडणाऱ्या गोष्टींनुसार त्याला आयत्या वेळेत बदल करावे लागतात.त्याचा प्रवास (जवळपासच्या भागात / वेगवेगळ्या शहरात), अवेळी खाणे-पिणे, उन्हा-तान्हात,धुळीत वावरणे, रात्री  उशिरापर्यंत काम, अशा अत्यंत अनिश्चित पद्धतीने त्याची दिनचर्या असते. त्याला आरोग्यसल्ला देताना या गोष्टीचा विचार करणे फार महत्वाचे आहे. तसे नसल्यास असा सल्ला फारसा उपयोगी पडणार नाही. 

उद्योजकतेवरील बऱ्याचशा पुस्तकांमध्ये उद्योग सुरु करण्यापासून ते तो चांगला यशस्वी करण्यावर भर दिलेला आढळतो. या परिस्थितीत आरोग्य कसे राखावे  यावर मात्र यशस्वी उद्योजक ह्या मासिकाने भर दिला आहे. सुरुवातीला कै. डॉ. एच्. व्ही. सरदेसाई यांचे मार्गदर्शन तर त्यानंतर डॉ. प्राची साठे यांचे उपयुक्त असे लेख आहेत.  मानसिक आरोग्यासाठी आतापर्यंत डॉ. अंजली पेंडसे, डॉ. संज्योत देशपांडे आणि आता डॉ. राजेंद्र बर्वे यांचे लेख आहेत.

उद्योजक यशस्वी होण्यासाठी त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे त्याने लक्ष पुरवावे ह्यासाठी ' यशस्वी उद्योजक ' ह्या मासिकाद्वारे केलेला प्रयत्न..!!


आज ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन..!! 

उद्योजकांना त्यांच्या उद्योगामध्ये ' आरोग्यपुर्ण ' यश मिळो ही शुभेच्छा.. !!

----- 

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

Wednesday, April 1, 2020

वेळेचा सदुपयोग - उद्योजकीय विचारांसाठीचा..!!

सध्याच्या ह्या कोरोना संकटाच्या काळात अनेकजण घरात बंद आहेत. एका दृष्टिकोनानुसार हा काळ विचार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण कोरोना हा विषय अतिशय गंभीरतेने घेतलेला असेल आणि त्या संबंधातील सूचनांचे तंतोतंत पालन केले असेल तर आपल्याला कोरोना संबंधित काळजी करण्याचे कारण नाही. 
घरातील कामे संभाळून आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो आहे, आपल्या जवळच्या मित्रांना / नातेवाइकांनाही  भरपूर वेळ आहे. फोनवर बोलायला, आपल्याला हवी असलेली माहिती शोधून काढायलाही आपल्याकडे वेळ आहे. घरातील सात्विक जेवण जेवल्याने तब्येतही चांगली असणार आहे. 

आपल्या भविष्याबद्दलच्या योजनांचा विचार करण्यासाठी उपयुक्त असा हा काळ आहे.


आपल्यापैकी काही असतील नोकरदार मंडळी. त्यातील काही फारसे खुश नसतील सुरु असलेल्या नोकरीबद्दल,काहींना खातेबद्दल करावा वाटतं असेल तर काहींना नोकरी बदलावी असाही विचार असेल. काहींना असे पर्यायही शक्य वाटतं नसल्यानं सहनशक्ती वाढवून सध्याचे दिवस पुढे रेटण्याचा विचार सुरु असेल.त्यांच्यासाठीच हा ' घरबंदी ' चा काळ त्यांच्या मनातल्या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठीची योजना बनवण्यासाठी उपयुक्त असेल.

आपल्यापैकी काहींचे शिक्षण झालेले असूनही अजून नोकरी न लागलेले असतील, शिक्षणानंतर अनुभव मिळवण्यासाठी कित्येकजण नगण्य अशी नोकरी करत असतील, कोणताच पर्याय डोळ्यासमोर नसल्याने जे मिळाले आहे त्याला स्वीकारून पुढे वाटचाल करीत असतील, असे जरी असले, तरी आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आणि आपल्या कुटुंबियांच्या भवितव्यासाठी आपण काहीतरी वेगळे करावे असे मनात मात्र येत असेलच. आजूबाजूच्या नेहमीच्या पाहण्यातील व्यक्तींनी असे काहीतरी वेगळे करुन स्वतःची प्रगती कशी साध्य केली याची असंख्य उदाहरणे त्यांनी पाहिलेली असतील.आपणही असे काहीतरी व्यवसाय / उद्योग केला पाहिजे, असे मनातून वाटणारे अनेक जण असणार यात शंका नाही.   

या सगळ्या मनातील विचारांना आजमावून पाहण्यासाठी प्रथम आपण ह्या विषयावरील पुस्तकांना / मासिकांना जवळ केले पाहिजे.आज मराठी भाषेमध्ये ह्या विषयांवर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकांतुन आपल्या मनातील विचारांना एका मार्गावर नेण्यास मदत होते. उद्योग / व्यवसाय हा छोट्यात छोटा असू शकतो, ज्यामधे पैशाची गरज ही कमीतकमी असू  शकेल. तसेच असाही उद्योग असेल की ज्यामधे पहाटे ३ / ३ || पासून  काम सुरु करुन रात्री १० पर्यंत करावे लागेल. काही उद्योगांमध्ये भरपूर प्रवास असेल तर काही उद्योगांमध्ये एका अत्यंत छोट्या जागेमध्ये दिवसभर थांबावे लागेल. एखाद्या उद्योगामध्ये पैशाची गरज खुप जास्त असेल आणि त्यात नफा सुरु होण्यासाठीचा लागणारा वेळही तुलनेने जास्त असेल. 

एखाद्या अनुभवी व्यक्तीला चांगला तांत्रिक अनुभव असेल परंतू त्या उत्पादनाविषयीच्या / सेवेविषयीची व्यावसायिक माहिती / अनुभव नसेल. पुस्तकांच्या / मासिकांच्या वाचनातून आपल्याला जाणीव होईल की, मला माझ्या विचारांना ( उद्योजक होण्याच्या ) पुढे नेण्यासाठी काय - काय तयारी करावी लागेल, माझ्या मानसिक / शारिरीक / आर्थिक क्षमतेनुसार मी कोणता व्यवसाय करणे जास्त चांगले असेल, अनेक यशस्वी मंडळींनी सुरुवात कशी केली होती, त्यांना सुरुवातीला कोणत्या अडचणी आलेल्या होत्या अन त्यावर त्यांनी कशी मात केली, त्यांना कोणी मार्गदर्शन केले अन आपल्यालाही असे मार्गदर्शन कसे मिळेल इत्यादी.

माझ्या इच्छुक उद्योजक मित्रांनो, मग करा सुरुवात आजपासूनच अन मिळवा माहिती मनातल्या उद्योजकीय तयारीसाठी.

धन्यवाद अन खुप खुप शुभेच्छा.

कार्यकारी संपादक - यशस्वी उद्योजक.

लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.