Saturday, July 25, 2020

गोष्ट व्यवसायातील स्पर्धकांविषयीची


                       आतापर्यंतच्या लेखांमधून आपण एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी काय तयारी करावी लागते त्या बाबतीतली माहिती घेतली. या सर्व माहितीनुसार आपण आपल्या ठरवलेल्या व्यवसायाबद्दल तयारी केली. स्वतः त्या व्यवसायामध्ये शक्य तितका अनुभव घेतला. त्याची व्यवहारिक बाजू समजून घेतली. हे सर्व झाले कि पुढील गोष्ट आहे ती आपल्या व्यवसायातील स्पर्धकांविषयीची. 



                  काही व्यवसाय असे असतात कि ते अत्यंत जवळच्या भागातील गिऱ्हाइकांच्यासाठी असतात. लांब राहणारे / वावरणारे लोक आपल्याकडे त्यांच्या गरजेसाठी येण्याची शक्यता कमी असते. उदा. दुध, किराणा, भाजी, चहाची टपरी, कटिंग सलून इ. काही व्यवसाय मात्र मोठ्या भागातील गिऱ्हाइकांसाठी असू शकतात. त्यात कपड्याची दुकाने, खेळणी, पुस्तके, फर्निचर इत्यादी. काही व्यवसाय तर संपूर्ण देशातील ग्राहकांसाठी असू शकतात. त्यात हटके वस्तूंच्या विक्रीचा समावेश असतो. आपल्या असलेल्या व्यवसायानुसार आपण आपल्या स्पर्धकांचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसायासारखाच व्यवसाय करणारे आजूबाजूला किती जण आहेत ? त्यांचा प्रत्येकाचा व्यवसाय कसा चालू आहे ? त्यांच्या व्यवसायात गिऱ्हाइकाचे प्रमाण किती आहे ? काही दिवसा / काही वेळेला प्रचंड गर्दी होते का ? त्या व्यावसायिकाचे त्याच्या गिऱ्हाइकांशी असलेले वर्तन कसे आहे ? त्याने लावलेली किंमत रास्त आहे का ? का त्यापेक्षा जास्त आहे ? गिऱ्हाईक समाधानी आहे का त्याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. गिऱ्हाईकाला हवी ती गोष्ट मिळते आहे का ? का त्याला नाईलाजास्तव काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात हे सुद्धा जाणून घ्यावे. एकंदर किती व्यावसायिक स्पर्धक आहेत ते ही महत्वाचे.  
                  नेहमी गर्दी दिसल्यास आपल्या व्यवसायाला चांगला वाव आहे. तुरळक गर्दी असल्यास वाव कमी आहे हे समजावे. त्या परिस्थितीत आपण आजूबाजूच्या परिसरात फिरून आपली जागा बदलल्यास वाव मिळू शकतो का ते पहावे. एखाद्या परिसरात नवीन इमारती होत असल्यास अथवा एखादा मोठा व्यवसाय त्या भागात येणार असल्यास भविष्यात गिऱ्हाइकाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. स्पर्धकांविषयीची संख्या, त्यांच्या कामाबद्दलची माहिती, गिऱ्हाईकांचे त्या व्यावसायिकांबद्दलचे मत अशा गोष्टी जाणून घेऊन आपण आपली योजना, व्यवसायाचे स्थान निश्चित करू शकतो. याबाबत पुढील उदाहरणे उपयोगी पडतील. 
                   पुण्यातील एका उपनगरातील गोष्ट.तिथे चष्म्याचा व्यवसाय सुरु करून १ वर्ष झाल्यावर व्यावसायिकाने दे आसरा फाउंडेशनशी संपर्क केला. त्यांना त्यांच्या व्यवसायात यश येत नव्हते. त्यांचे पुण्यातील दुसऱ्या भागात चष्म्याचे दुकान होते आणि तिथे व्यवसाय उत्तम चालला होता. नवीन व्यवसाय सुरु केला तो आधीच्या दुकानाच्या अनुभवावर आधारित होता.दे आसरा फाउंडेशनच्या तज्ञाने त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर जाऊन पाहणी केली. त्याच्या लक्षात आले कि त्या भागात चष्म्याची ७ दुकाने आधीच म्हणजे ३ ते ४ वर्षे आधीपासूनच होती. ह्या स्पर्धक व्यावसायिकांचे त्या भागात चांगले बस्तान बसलेले होते. त्या प्रत्येकाचे ठराविक गिऱ्हाईक होते आणि त्या गिऱ्हाइकांच्या मार्फत त्यांना नवीन गिऱ्हाईक मिळत होते. व्यावसायिकांनी आपापल्या ग्राहकांना चांगली सेवा / तत्पर सेवा देऊन समाधानी ठेवलेले होते. अशा परिस्थितीत त्या भागात नवे दुकान चालवणे सोपे राहिलेले नव्हते. त्या व्यावसायिकाला त्यांचे व्यवसायाचे ठिकाण बदलण्याचा सल्ला देण्यात आला. नवे ठिकाण ठरवताना तेथील स्पर्धकांची माहिती आणि ग्राहकांची संख्या पाहण्यात आली.नवीन ठिकाण त्या व्यावसायिकाला लाभदायक ठरले  आणि व्यवसाय चांगला चालत आहे. 
                    पुण्यातील उपनगरातील आणखी एक गोष्ट. ह्या व्यावसायिकाने एक खानावळ सुरु केली. अत्यंत माफक दरामध्ये मर्यादित थाळी पण बहुतेकांसाठी पोटभर अशी. त्या व्यावसायिकाने इतर काही जबाबदाऱ्यांमुळे हा व्यवसाय एका माहितीच्या माणसास चालवायला दिला. वर्षभराने ह्या माणसाने स्वतः ह्याच्या जागेच्या शेजारची जागा घेऊन खानावळ सुरु केली. ह्या माणसालाच सगळे ग्राहक ओळखत असल्याने सर्वजण त्याच्या खानावळीत जाऊ लागले व व्यावसायिकाची खानावळ ओस पडली. महिन्याभराने त्याने दे आसरा फाउंडेशन ला संपर्क केला. फाउंडेशन च्या तज्ञाने व्यवसायाच्या जागेला भेट दिली. शेजारच्या खानावळीचे स्वरूप पाहिले. त्यावरून आता पुन्हा खानावळ चालविणे अवघड दिसले. त्यामुळे व्यवसायात बदल करावा लागेल असे लक्षात आले. त्यासाठी खाद्य उद्योगातीलच कोणते पदार्थ असावेत ह्याचा परिसरात फिरून अभ्यास सुरु केला. बहुतेक सर्व पदार्थांचे उद्योग आजूबाजूच्या भागात चालू होते अन त्यात वाव कमी होता. परिसरात अनेक लोक मूळचे खान्देशातील आहेत हे ही लक्षात आले. मग खान्देशातील लोकांना आवडणारी कचोरी बनवायचा निश्चय करून व्यवसाय सुरु झाला. अल्पावधीतच तो चांगला वधारला कारण तो पदार्थ जवळच्या परिसरात कोणीही बनवत नव्हते. मग कचोरीबरोबर इतर पदार्थ हि तो बनवू लागला आणि सुस्थापित झाला. 
                 व्यवसायाचे स्थान, त्यातील स्पर्धक, गिऱ्हाइकाचे प्रमाण, व्यवसायवाढीच्या शक्यता ( आजूबाजूच्या परिसराचा विकास ) ह्या सर्व गोष्टी व्यवसाय सुरु करताना विचारात घ्याव्यात. रेल्वे स्टेशन, एस टी स्टॅन्ड,  शाळा / कॉलेजेस, सरकारी कार्यालये, मुख्य बाजारपेठ ह्या ठिकाणी एका व्यवसायाचे अनेक स्पर्धक असतात. ते सर्व यशस्वी होतात कारण तेथे अनेक ग्राहक आजूबाजूच्या परिसरातून येत असतात. इतर ठिकाणी ही शक्यता कमी असते. 

 ---- 


लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.