Friday, June 12, 2020

उद्योग संधी हेरली, आता पुढे काय ?

                  मी उद्योग व्यवसाय करू शकतो का ? ह्या मनातल्या विचारांना चालना देऊन आपण वेगवेगळ्या उद्योगसंधींचा विचार केला. संधींचा विचार करताना कशा कशाचे भान ठेवायला पाहिजे त्याचाही विचार केला. आपल्याकडे पैसे आहेत, जागा आहे किंवा काही प्रमाणात ज्ञान आहे एवढंच उद्योग यशस्वी करण्यासाठी पुरेसं  नसतं हे ही आपण पाहिले. उद्योगसंधीकडे कशाप्रकारे पहावे, आपण त्यातील कोणती संधी निवडावी हे अनेक गोष्टींवर ठरते हे ही आपण जाणून घेतले.    


                             जो उद्योग आपण करू इच्छितो, त्या उद्योगातील वेगवेगळ्या गोष्टी शिकणे, माहिती करून घेणे, त्याचा शक्य तितका अनुभव घेणे ही पुढची महत्वाची पायरी. प्रत्येक छोट्या व्यवसायात सुद्धा अनेक खाचाखोचा असतात. त्या प्रत्यक्ष काम केल्याशिवाय कळणे शक्य नसते. आपल्या घरात अनेक वर्षे पोळ्या करताना पाहून स्वतःला पोळ्या करता येत नाहीत. तसेच अनेक जणांना पोहताना पाहून आपल्याला आपोआप पोहता येत नाही. त्यासाठी स्वतः पाण्यात उतरून, अनुभवी मंडळींच्या मदतीने सुरुवात करावी लागते आणि मग काही काळ स्वतः पोहून वेगवेगळे प्रयोग करून सगळे बारकावे शिकून घ्यावे लागतात. उद्योग कितीही छोटा असला तरी त्यातले बारकावे माहिती करून घेऊन मग उद्योगास सुरुवात केली कि अडथळे कमी येतील आणि आपला आत्मविश्वासही वाढलेला असेल. कित्येक जणांना उद्योगातील आर्थिक बाजूची पूर्ण कल्पना नसते. त्यातील तांत्रिक बाजू माहिती असून भागणार नाही. व्यावहारिक  बाजूही पूर्णतः माहिती पाहिजे. एखादी गोष्ट बनवताना ती आपल्याला केवढ्याला पडली आणि ती काय किमतीला विकणे हे फायद्याचे होईल याची संपूर्ण माहिती करून घ्यायला पाहिजे. खाद्य उद्योगात तर अशी माहिती फार महत्वाची. बाजारामध्ये अनेक स्पर्धक असणार. त्यांच्या विक्रीच्या किमतीपेक्षा आपण जास्त किंमत लावू शकणार नाही. कित्येकदा तयार खायचे पदार्थ पूर्ण न खपल्याने वाया जातात. अचानक पाऊस किंवा इतर कारणाने विक्री कमी होते. अशा वेळेला नुकसान होऊ नये म्हणून  काय करावे ? महिन्याभरात असे कितीदा अनुभव येतात ?  पदार्थासाठीचे लागणारे  सामान कसे तपासून घ्यायचे ? उन्हाळ्यात पदार्थ टिकावे, खराब होऊ नये म्हणून काय करायचे ? अशा अनेक गोष्टींचा विचार करून आपल्याला विक्रीची किंमत ठरवावी लागते. भाजी, फळे, शीतपेये, सकाळच्या वेळी फिरणाऱ्या लोकांसाठी आरोग्य पेय विकणारे, सगळ्यांना हा विचार करणे आवश्यक आहे. पुस्तक विक्री, स्टेशनरी, किराणा माल, औषध विक्री, अशा अनेक व्यवसायांमध्ये माल खराब किंवा वाया जाणारा (expiry) असू शकतो. त्याचा विचार न केल्यास नुकसान होऊ शकते. 
                              उद्योग व्यवसायासाठीचा महत्वाचा भाग म्हणजे आपला ग्राहक. आपले सर्व विचार, निर्णय हे त्या ग्राहकाच्या गरजेवर, त्याच्या पसंतीवर, त्याच्या आवडीनिवडीवर आणि त्याच्या परवडण्यावर अवलंबून असतील. ग्राहकवर्ग हा जेष्ठ नागरिक, पगारी नोकरवर्ग, सरकारी कर्मचारी, महिलावर्ग, मजूरवर्ग, उद्योग / व्यावसायिक  अशा सगळ्या घटकांचा  असतो. या वेगवेगळ्या घटकांना काय हवे आहे ( उच्च गुणवत्ता / ब्रँडेड /चांगले  पण कोणताही ब्रँड / स्वस्त आणि छोट्या पॅकिंग मधले ) त्यांना घरपोच सेवाही हवी आहे का ? त्यांचा आर्थिक स्थर ( महिन्याची मिळकत ) कशी आहे अशी माहिती मिळवायला पाहिजे. आरोग्यपूर्ण सेवेला किती महत्व दिले जाते, दुकान किंवा सलून किंवा कपडे धुलाई केंद्र यासाठी  त्याचा आकार, त्यातील मांडणी, रंगरंगोटी इ. गोष्टी त्या अपेक्षेनुसार करावी लागेल. एकंदरीत ग्राहकाच्या अपेक्षा माहिती करून त्या पूर्ण करण्याची तजवीज करावी लागेल. 
                                     ग्रामीण भागात किंवा शेतीमालावर अवलंबून असलेला व्यवसाय असला तरी त्यासाठी सुद्धा त्याचा ग्राहकवर्ग कोणता हे जाणून घेऊन त्याप्रमाणे व्यवसायाची तयारी करणे आवश्यक. काही हटके व्यवसायही विचारात घेतले पाहिजेत. नारळ विक्रेते अनेक असतात. एकाने नारळ विकणे सुरु केले. त्याचबरोबर सोलून देणे, फोडून देणे, त्यातील पाणी कागदी ग्लासात देणे, तो खोवून देणे, अशा सेवा जोडल्या. महिन्याभरात त्याच्याकडे ग्राहकांची गर्दी होऊ लागली. कित्येकांच्या घरात नारळ फोडायची आणि खोवायची सोय नाही हे ओळखून त्याने हा व्यवसाय सुरु केला. नुसत्या नारळ वाल्यांपेक्षा ह्याचा व्यवसाय दस पटीने जास्त आहे.       
    
  ---- 


लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.